प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून गौरवास्पद नियुक्ती.

 प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून गौरवास्पद नियुक्ती.
मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 9595470800

महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, तसेच लैंगिक छळाच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समित्यांवरील अशासकीय सदस्यांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत लिनेस क्लब पाचोरा अध्यक्षा तथा श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांवर महिलांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तसेच सुरक्षित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी जनजागृती, मार्गदर्शन आणि आवश्यक शिफारसी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही समितीमार्फत केले जाते.
महिला व बाल विकास विभागाने यापूर्वीची सदस्य यादी कालबाह्य झाल्याने २० जुलै २०२६ रोजी सुधारित यादी जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. अनुभवी, सामाजिक जाण असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्तींना या समित्यांवर संधी देण्यामागे तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्याचा शासनाचा उद्देश आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांची या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवड झाल्याने पाचोरा परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिलांच्या न्यायहक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विविध सामाजिक, शैक्षणिक व महिला संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.