अक्षरापासून विचारांपर्यंत नेणारा प्रवास...ज्ञानदीप लावणारे माझे गुरु.शिक्षक दिनाच्या निमित्ताने कु.चेतना हिरे या विद्यार्थिनीच्या शब्दांतून प्रा. सौ. जयश्रीताई वाघ मॅडम* यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना.
अक्षरापासून विचारांपर्यंत नेणारा प्रवास...ज्ञानदीप लावणारे माझे गुरु.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने कु.चेतना हिरे या विद्यार्थिनीच्या शब्दांतून प्रा. सौ. जयश्रीताई वाघ मॅडम* यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना.
नातं फक्त गुरु-शिष्याचं नव्हे, तर जीवनाच्या वाटचालीतली एक प्रेरणादायी सखी आणि संवेदनशील मार्गदर्शक असलेल्या व्यक्तीशी जोडलेलं आहे.
“गुरु” हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर अशी व्यक्ती उभी राहते, जी केवळ ज्ञान देत नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवते; हात धरून चालायला शिकवते आणि एका क्षणी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळही देते. माझ्या आयुष्यात अशाच एका तेजस्वी, समर्पित, प्रेमळ आणि ममतेच्या सागरासारख्या व्यक्ती म्हणजे प्रा. जयश्री वर्मा-वाघ मॅडम. माझ्यासाठी त्यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे केवळ कौतुकाचे शब्द लिहिणं नाही, तर अंतःकरणात साठलेल्या कृतज्ञतेला शब्दरूप देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
मी आर्ट्स विभागातील विद्यार्थिनी आणि मॅडम वाणिज्य विभागातील प्राध्यापिका. आमचे विषय वेगळे, अभ्यासक्रम वेगळे; त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आमचा थेट संबंध फारसा येत नाही. पण काही नाती विषयांच्या आणि वर्गखोल्यांच्या पलीकडे जाऊन मनाशी जोडली जातात. मॅडमसोबतचं माझं नातं असंच आहे.गुरु-शिष्याचं, पण त्याचबरोबर एका जिव्हाळ्याच्या मार्गदर्शकाचं.
मॅडम नेहमी आम्हाला म्हणतात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत एक प्रकाश असतो. फक्त तो प्रज्वलित करणं हे शिक्षकाचं काम असतं. त्यांच्या या एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब दिसतं. त्यांनी माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनातला आत्मविश्वास जागा केला, स्वप्नांना दिशा दिली आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न सोडू नयेत, ही शिकवण दिली.
शिक्षण क्षेत्रात तब्बल १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मॅडमनी अध्यापनाला केवळ नोकरी म्हणून स्वीकारलेलं नाही, तर ते एक ध्येय म्हणून जगलं आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासात १३ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत, तसेच दोन पुस्तकांमध्ये दोन अध्याय प्रकाशित झाले आहेत. आकाशवाणीच्या ‘स्पंदन’ तसेच विनिता मंडळ या कार्यक्रमांमधून त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय परिषदेत ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’चा प्रथम पुरस्कार मिळवून त्यांनी आपल्या ज्ञानाची आणि संशोधनवृत्तीची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी उंची केवळ पुरस्कार, संशोधन किंवा शैक्षणिक यशात मोजता येत नाही. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन एखाद्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणं, हे त्यांच्या कार्याचं खरं वैशिष्ट्य आहे. डॉक्टरांच्या समूहासोबत HOPE प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या अशक्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम त्यांनी समन्वयक म्हणून केलं. एखाद्या गरजू मुलाच्या हातात पुस्तक देताना त्या केवळ पुस्तक देत नाहीत, तर त्याच्या हातात भविष्यातील शक्यता ठेवतात.
लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी व्यापक स्वरूप मिळालं. पर्यावरण संरक्षणापासून ते बालिका दत्तक घेण्यापर्यंत, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरणापासून अन्नदानापर्यंत अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पशु-पक्ष्यांसाठी हौद निर्माण करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करणे, HIV/AIDS Awareness साठी पत्रकांचे वितरण करणे, महिला व बालिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेणे, तसेच कष्टकरी मजुरांना गमछा व चप्पलचे वितरण करणे या प्रत्येक कार्यामागे त्यांच्या मनातील माणुसकीची जाणीव दिसून येते.
मॅडमचं व्यक्तिमत्त्व एका चौकटीत बसणारं नाही. त्या रेकी आचार्या आणि योग शिक्षिका आहेत. त्यांच्या सहवासात एक शांत ऊर्जा जाणवते. जीवनात संतुलन कसं राखावं, मनाला स्थैर्य कसं द्यावं आणि सकारात्मक विचारांनी परिस्थितीकडे कसं पाहावं, हे त्यांच्या वागण्यातूनच शिकायला मिळतं. त्या भारतीय लोकनृत्य आणि बेसिक क्लासिकल डान्समध्येही प्रावीण्य मिळवलेल्या आहेत. फाईन आर्टमध्ये त्यांची असलेली रुची त्यांच्या कल्पक आणि कलात्मक मनाची साक्ष देते. कॅरममधील सुवर्णपदक, क्रिकेट-बेसबॉलमधील सहभाग आणि कराटेतील ग्रीन बेल्ट हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू दाखवतात.
त्यांनी शिक्षणाला केवळ वर्गखोलीपुरतं मर्यादित ठेवलं नाही. फिनिक्स अकॅडमीच्या संस्थापिका व संचालिका म्हणून अनेक विद्यार्थिनींच्या आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना त्यांनी व्यासपीठ दिलं. शिक्षणात मागे राहिलेल्या मुलांसाठी आशेचा हात बनणं, त्यांना आत्मविश्वास देणं आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं, ही त्यांची विशेष ओळख आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं समजून घेत त्या अनेकदा समुपदेशकाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी केवळ प्रश्न घेऊन जात नाही, तर मन घेऊन जातो आणि उत्तरासोबत नवा आत्मविश्वास घेऊन परततो.
त्यांच्या सामाजिक जाणीवेची व्याप्तीही तितकीच मोठी आहे. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे स्थानिक अशासकीय सदस्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. समाजातील महिला आणि बालकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची आणि त्यांच्यासाठी काहीतरी ठोस करण्याची त्यांची भूमिका यामधून अधोरेखित होते.
आजच्या डिजिटल युगात बदलत्या आव्हानांची जाणीव ठेवून त्यांनी Cyber Crime Awareness Seminar मध्ये प्रमुख समन्वयक म्हणून काम केलं, तसेच Digital Banking and Awareness Seminar मध्येही समन्वयकाची जबाबदारी पार पाडली. म्हणजेच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू केवळ शिक्षण नसून ज्ञान, जागृती, स्वावलंबन आणि सामाजिक जबाबदारी हा आहे.
पशु-पक्ष्यांविषयीची त्यांची संवेदनशीलताही तितकीच मनाला स्पर्शून जाते. गौसेवा व संरक्षण कायद्यासाठी निवेदन देऊन त्यासाठी प्रयत्न सुरू करणे, हीदेखील त्यांच्या सामाजिक बांधिलकीचीच एक बाजू आहे. माणसांबरोबरच मुक्या जीवांविषयीही काळजी असणं, ही त्यांच्या मनाच्या विशालतेची जाणीव करून देते. मॅडमच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण सुंदर संगम आहे शिक्षिकेची शिस्त, आईची माया, मैत्रिणीचा जिव्हाळा, समाजसेविकेची संवेदना, संशोधकाची जिज्ञासा आणि मार्गदर्शकाची दूरदृष्टी. त्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास शिकवत नाहीत; त्या जीवन समजून घ्यायला शिकवतात. गुणपत्रिकेतील गुणांपेक्षा माणूस म्हणून मोठं होणं अधिक महत्त्वाचं आहे, हे त्या आपल्या कृतीतून दाखवून देतात.माझं शिक्षण संपलं, कॉलेजची पायरी सोडली, विद्यार्थी म्हणून मॅडमच्या वर्गापासून दूर झाले; पण मॅडमनी मला मार्गदर्शन करणे कधीच सोडलं नाही. कॉलेज संपलं म्हणजे गुरु-शिष्याचं नातं संपत नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून मला जाणवून दिलं. आजही आयुष्यातील एखादा निर्णय घ्यायचा असो, मनात एखादी शंका असो किंवा भविष्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला असो त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे., कॉलेज सुटलं, पण मॅडमचा हात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून कधीच सुटला नाही. म्हणूनच माझ्यासाठी त्या केवळ कॉलेजमधील शिक्षिका नाहीत, तर कॉलेजच्या पलीकडेही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिशा दाखवणाऱ्या माझ्या मार्गदर्शक आहेत.
कधी कठोर वाटणारी त्यांची शिस्त हीदेखील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असते आणि कधी मायेने विचारलेला त्यांचा एक साधा प्रश्न मनातला सारा थकवा दूर करून जातो. म्हणूनच त्यांच्याशी जोडलेलं नातं केवळ ‘मॅडम’ या संबोधनापुरतं राहत नाही , ते मनात आदर, आपुलकी आणि कृतज्ञतेचं स्थान निर्माण करतं.
अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला शब्दांत पूर्णपणे मांडणं खरंच कठीण आहे. कारण काही व्यक्तींची ओळख त्यांच्या पदांमुळे होत नाही; त्यांनी स्पर्श केलेल्या आयुष्यांमुळे होते. मॅडमनी अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा दिली, अनेक गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण आणला आणि समाजासाठी आपल्या परीने सतत काहीतरी करण्याचा प्रयत्न केला.
म्हणूनच माझ्यासाठी त्या केवळ आदर्श शिक्षिका नाहीत, तर आदर्श समाजसेविकाही आहेत. त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश, मायेची सावली आणि मार्गदर्शनाचा हात असाच आयुष्यभर लाभत राहो, हीच मनापासून प्रार्थना.
कु. चेतना रणदीप हिरे
Comments
Post a Comment