श्वेता सीमा विनोद पाटील शौर्य पुरस्काराने सन्मानित.
श्वेता सीमा विनोद पाटील शौर्य पुरस्काराने सन्मानित
पुणे येथील पत्रकार भवनात आज मदत वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्वेता सीमा विनोद पाटील यांना *शौर्य पुरस्कार* प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना श्वेता पाटील यांनी, “हा सन्मान स्वीकारणं म्हणजे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे, याची पूर्ण जाणीव आहे,” अशी भावना व्यक्त केली.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही मुलींवर आणि महिलांवर अत्याचार होणं, तसेच अनेक वेळा त्यांना व्यवस्थेकडून अपेक्षित मदत न मिळणं ही अत्यंत दुःखद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. “अशी परिस्थिती कोणत्याही मुलीवर किंवा महिलांवर येऊ नये यासाठी समाजातील सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. हेच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मदत वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली वारुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे श्वेता सीमा विनोद पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. अनाथ मुलांसाठी ट्रस्टकडून सुरू असलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेकडून मिळालेला पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण होते. यावेळी निवृत्त पोलिस महासंचालक विठ्ठलराव जाधव, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Comments
Post a Comment