माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थ, पिंपळगाव हरेश्वर समवेत शोकसभा कार्यक्रम संपन्न.
माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थ, पिंपळगाव हरेश्वर समवेत शोकसभा कार्यक्रम संपन्न.
अण्णासाहेब कै. डॉ. रामकृष्ण बालचंद तेली* यांचे दिनांक 12. 8. 2022 शुक्रवार रोजी दुःखद निधन झाले. त्या प्रित्यर्थ त्यांची शोकसभा माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थ पिंपळगाव हरेश्वर यांचे वतीने मूकबधिर निवासी विद्यालयात आज दिनांक 17.8. 2022 बुधवार रोजी संपन्न झाली. सुरुवातीस कै. डॉ. आर.बी. तेली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. शोक सभेचे अध्यक्ष स्थानी मा. श्री पी एस पाटील सर होते.
कै. डॉ.आर.बी.तेली हे पिंपळगाव हरे व पंचक्रोशीतील पहिले उच्चशिक्षित एमबीबीएस डॉक्टर होते.सुरुवातीस त्यांनी बोदवड, वाकडी, पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. तद्नंतर पाचोरा शहरातील नगरपालिकेच्या दवाखान्यात सुमारे 19 वर्षे अविरत सेवा केली. त्यांनी गोरगरीब रुग्णांची अतिशय तळमळीने सेवा केली. तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्या तेली समाजाच्या अध्यक्षपदी काम केले. ग्रामविकास मंडळ, पिंपळगाव हरेश्वर येथे चिटणीस पदावर काम पाहिले. तसेच अपंगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी संघाचे कार्यकारी सदस्य नंतर गेल्या 16 ते 17 वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत होते. ते एक उत्तम मार्गदर्शक होते. एक सकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे होती. मा.श्री. आर डी देशमुख सर, श्री जाधव सर, श्री देविदास महाजन, श्री.पी. बी. पाटील साहेब,श्री. शांतीलालजी तेली, श्री.प्रकाश चव्हाण, श्री.पांडेजी सर, श्री. झेरवाल सर, श्री. विपुल मालकर यांनी श्रद्धांजलीपर आपले मनोगत व्यक्त करताना कै. अण्णांचा शालेय जीवनापासून ते सामाजिक आणि कौटुंबिक जीवनपट वर्णन करून एक ज्वाली, हसतमुख, सकारात्मक ऊर्जा अन् दूरदृष्टी असलेल व्यक्तिमत्व! असल्याचे सांगून ते अजात शत्रू होते. कुटुंबाचे व समाजासाठी प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या सहवासातील अनुभवलेले क्षण या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने माजी विद्यार्थी संघाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांची उणीव नेहमीच जाणवत राहील.अध्यक्षीय मनोगतातून श्री. पी. एस.पाटील सर यांनी सांगितले की अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचे अनमोल कार्य त्यांच्या हातून घडले होते. या कुटुंबीयांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःखभार हलका व्हावा म्हणून परमेश्वर त्यांना शक्ती देवो, बळ देवो. मृतात्म्यास चिरशांती लाभावी म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करून सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली.सभेचे सूत्रसंचालन श्री. गोविंद महाजन यांनी केले.
Comments
Post a Comment