ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे आज वाढदिवस; वाढ दिवसा निमित्त माजी विध्यार्थी यांनी आपआपले मनोगत व्यक्त करून शाळेला वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या..

 ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे  एकवीस जुन आज वाढदिवस; वाढ दिवसा निमित्त माजी विध्यार्थी               यांनी आपआपले मनोगत व्यक्त करून शाळेला वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या..



ग्राम विकास विद्यालयाची स्थापना ही 21 जून 1954 साली झाली.तेव्हा पासून ते आता पर्यंत शाळेत खूप विध्यार्थी यांनी शिक्षण घेऊन आज मोठ मोठ्या पदावरती आहेत. शाळेच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या व शाळेबद्धल आपआपले मनोगत व्यक्त केले.


आज वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि माझी शाळा ग्राम विकास विद्यालयाचा वाढदिवस!!
सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठं व्हावं म्हणून माझ्या शाळेने विविध सहशालेय उपक्रम, स्पर्धा, शिकवणी वर्ग घेतले ,विद्यार्थीकेंद्रित शिक्षणप्रणाली राबविली त्यामुळे अनेक विद्यार्थी सर्वच क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
मुकेश हिवाळे,तहसीलदार भडगाव


आज आपल्या शाळेचा वाढदिवस... 68 वर्षे वय असलेल्या या ज्ञानवृक्षानं गावाकडच्या मातीतला सुगंध आणि शहरातल्या स्पर्धा या दोहोंचा सुरेख संगम साधून काल/आज/उद्याच्या भारताचे नागरिक घडवले.. आज विविध क्षेत्रात विविध पातळ्यावर आपल्या शाळेचे विद्यार्थी नेतृत्व करत आहेत, यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे, असं मी समजतो.. शाळेचे हे अस्सल रूप पिढ्यानपिढ्या असेच टिकून राहोत, याच सदिच्छा..

विवेक वाघे (कनिष्ठ संशोधक - ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन, मुंबई)


ग्राम विकास विद्यालय ही माझी शाळा, हाच माझा अभिमान आहे, माझं प्रेम आहे,माझं वात्सल्य आहे, ग्राम विकास विद्यालय ही माझी आई आहे, शाळेने केलेले माझ्यावरील मूलगामी संस्कारां मुळेच  मला जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद घेता आला, ग्रामविकास विद्यालयातील क्रीडांगणाच्या मातीचा सुगंध नेहेमीच माझ्या मनामध्ये दरवळत राहतो, ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथील  मातीमध्ये, या शाळेच्या कुशीमध्ये माझ्या बालपणातील आठ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी अतिशय आनंदाचा, शिकण्याचा,संस्कारांचा, विनम्रतेचा  गेला याचा मला अभिमान वाटतो, आजही आम्हाला ग्राम विकास विद्यालय ने जे दर्जेदार मोफत शिक्षण दिले तसे शिक्षण शहरी भागातही लाखो रुपये खर्च करूनही आज मिळू शकत नाही, त्यामुळेच माझ्या या शाळा रुपी मातेचं ऋण या ठिकाणी व्यक्त करण्याची मला आवश्यकता वाटते, ग्राम विकास  विद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

माझ्या या प्रिय शाळेला  माझे कोटी कोटी नमन

शुभेच्छुक:::पृथ्वीराज गोविंदराव चव्हाण ( बीएस्सी, बीएड, एम ए (लिटरेचर) संगीत विशारद )माजी विद्यार्थी ग्राम विकास विद्यालय


 मला अभिमान आहे मजा शाळेचा 68 वा आहे मी या शाळेत पाचवी ते बारावी शिक्षण घेतलेले आहे. माजा अनुभवाने आमच्या वेळेस गुरुजन वर्ग सर्व शिस्तप्रिय होते. शैक्षणिक पात्रता फार चांगली होती.माजा स्मरणातील काही शिक्षक जसे पाठक सर,पुरोवणीक सर,गरुड सर ,एस एस पाटील सर,बी.आर महाजन सर पि.आर आण्णा सर,कुलकर्णी सर व  इतर काही या सर्व शिक्षक वृंद यांच्या छत्रचयेखाली आम्ही घडलो आम्हाला अभिमान आहे

राजेंद्र देवचंद तेली  उर्फ राजाबाबू


शाळा म्हटलं की किती अन काय आठवायला लागतं... 

शाळेच्या परिसरातले निंबाचे डेरेदार सावली देणारे झाडं, मधल्या सुट्टीत त्या झाडांखाली एकत्र बसून खाल्लेले डबे, वर्गातल्या बेंचवरून झालेले भांडणं, वर्गात गोंधळ दिसतोय म्हणून अचानक मुख्याध्यापकांचं वर्गात येणं, परीक्षेच्या दिवसात टेन्शन सोबही येणारी मजा,आपल्या वाढदिवसाच्या दिवशी स्टेजवर आपलं घेतलं जाणारं नाव, खो खो कबड्डीची धमाल, बेस बॉल ने खेळलेले क्रिकेट , पंधरा ऑगस्टला होणारा सुंदर सोहळा.... 

ग्राम विकास विद्यालय म्हटलं की आयुष्याचा एक महत्त्वाचा पण हातून निसटून गेलेला पट समोर येतो. शाळा सुटली, गाव सुटलं नव्या संधी, नवी शहरं खुणावू लागली... पण आजही जेव्हा कुणी विचारतं की तुमची शाळा कशी होती तर उत्तर असतं आमची शाळा सर्वकाही होती. आज जी थोडीफार धडपड मी माझ्या माझ्या क्षेत्रात करू बघतेय त्याची सुरुवात शाळेत झाली. शाळेने, शाळेतील शिक्षकांनी, आणि सगळ्या स्टाफने आवडत्या गोष्टी करण्यासाठीचा अवकाश उपलब्ध करून दिला. भाषण असू दे नाहीतर लिखाण, प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःचा वेळ देणारे आणि प्रोत्साहन देणारे शिक्षक आमच्यासोबत होते. मी कविता लिहू शकते, चांगला निबंध लिहू शकते, चांगलं भाषण करू शकते, माझ्यात थोडेफार नेतृत्व गुण आहेत हा  विश्वास माझ्या शाळेने मला दिला. त्या विश्वासाच्या जोरावरच आजचा प्रवास सुरू आहे. आयुष्यात खूप काही मिळवलंय असं नाही.. पण आवडीच्या क्षेत्रात ताकदीने उभं राहायचं बळ शाळेने मला दिलं यासाठी मी शाळेची आयुष्यभर ऋणी राहील... बाकी, अजूनही जून महिना nostalogic करून जातो. शाळा सुरू होऊन काहीच दिवस झालेले असतात. त्यात शाळेचा वाढदिवस येतो... २१ जून हा दिवस जून मधल्या पावसासारखा शाळेच्या आठवणींत भिजवून टाकतो. वाटतं की कुणीतरी शिक्षकांनी आजही ऑफिस च्या बाहेर च्या फळ्यावर शाळेच्या वाढदिवसाच्या सदिच्छा लिहलेल्या असतील. आजही आपण प्रार्थनेच्या वेळच्या लांबच्या लांब रांगेत उभे आहोत. अन् शाळेच्या वाढदिवसानिमित्त जोरजोरात टाळ्या वाजवतोय अन म्हणतोय,

Happy birthday शाळा

माझी शाळा अधिक सुंदर, सजग होत जावो. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ती दिशादर्शक ठरत जावो एवढ्याच सदिच्छा!

श्वेता सीमा विनोद

( कॅम्पेन मॅनेजर - इंडियन पॉलिटिकल अँक्शन कमिटी, पटना, बिहार ) लेखक - कादंबरी ' आपल्याला काय त्याचं...'


शाळा म्हणल की लहानपणीचे, मजा - मस्तीचे दिवस आठवतात. शाळेत केलेली मस्ती आठवते.शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता.शाळेचे दिवस परत येत नाहीत. म्हणुन ते तेव्हाच जगायचे असतात. शाळेचे ते दिवस आठवले की

उगीचच मोठ झाल्या सारख वाटत

शाळा हे आपल्या आयुष्यातला महत्वपूर्ण

भाग आहे शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून

संपला ना तेव्हां कळतो अणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य

नावाच पुस्तक घडवल

अजय देशमुख पिंपळगाव हरे 


शाळा ही शिक्षणाची दारे आहेत जी यशाकडे घेऊन जातात. ते तरुण उज्ज्वल मनाला प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि भविष्यासाठी तयार करण्यात मदत करतात. सर्वोत्तम शाळा नेहमीच उत्तम विद्यार्थी घडवते. माझी शाळा ही माझ्या परिसरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित शाळा आहे. ग्राम विकास विद्यालय या माझ्या शाळेत शिकण्याचे   भाग्य मला लाभले  त्या  शाळेचा मी जन्मभर ऋणी राहीन.

श्री. संदीप मालकर  निदान लॅब पिंपळगाव हरेश्र्वर


आज 21 जून आपल्या ग्राम विकास विद्यालय शाळेचा वाढदिवस...

शाळा संपली पण शाळेच्या त्या गोड आठवणी सावलीसारख्या आजही सोबत आहेत...

शाळेचे माझ्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे... शिकता शिकता आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे माझी शाळा होय...

आपली शाळा व त्यातील सर्व शिक्षकांनी चांगले आणि वाईट यातील फरक दाखवून, नेहमीच योग्य मार्गावर जाण्यास शिकवले...यशस्वी होण्याचा मंत्र दिला, म्हणूनच आज मी जे आहे त्यात शाळेचा व शिक्षकांचा मोठा हातभार आहे...

हे शाळा तुझ्या समवेत माझं बालपण गेलं, तुझ्या समवेत आयुष्याचं गणित उलगडलं..

नकळत का कळेना पण जगणं कळलं, इतक्या वर्षाने पुन्हा मन शाळेकडे वळलं...

आज तू 68 वर्षे पार केली आहेस,अभिमान नाही तर गर्वाने मान उंचावतेय...

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते...

          || शाळा ||

ड्युटीवरील खुर्ची पेक्षा,

माझ्या शाळेचा बाकच बरा होता.

कामाच्या या व्यापापेक्षा,

आमचा गृहपाठच बरा होता....

कितीही असला नोकरीचा लळा,

तरी माझ्या शाळेचा फळांच बरा होता, 

सततच्या टेंशन पेक्षा,

गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता....

मोबाईल वरील व्हॉटसअप, फेसबुक पेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता....

हरवलो आहे आयुष्यात सुख मिळविण्यासाठी,

पण मित्रा आपला तो शाळेतील बालपणीचा काळच बरा होता.....

-प्रशांत भाऊराव पाटील, उपशिक्षक, खाजगी प्राथमिक विद्या मंदिर,पिंपळगाव (हरे)


माझे १ ली ते १२ वि पर्यंतचे पूर्ण शिक्षण ग्राम विकास विद्यालयात झाले.  शाळेने आम्हाला खूप काही दिले, आज मी जे काही आहे ते माझ्या शाळेमुळे आहे. त्या वेळी काम करणारे शिक्षक, त्यांची शिकवण्याविषयीची तळमळ या गोष्टी आजही आठवतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी मिळणारे शिक्षण हे उत्तम दर्जाचे व पूर्णपणे मोफत होते जे आजच्या काळात मिळणे फार कठीण आहे . माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या काही शिक्षकांची नावे सांगायची झाल्यास मी श्री.एस.एस.पाटील सर, चिंचोले सर यांची नावे  घेईल.

आपल्या शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वाना खूप खूप शुभेछया.

प्रशांत मालकर

माजी विद्यार्थी, ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव (हरेश्वर)

सध्या - सहायक अधीक्षक डाकघर , नाशिक

आज 21 जून आमच्या शाळेचा वाढदिवस.ग्राम विकास विद्यालय, पिंपळगांव हरेश्वर शाळा संपली,पण आठवणी मात्र सावलीसारख्या सोबत आहेत.शिक्षक, ग्राउंड, फळा, दप्तरा, वह्या, पुस्तक, मित्रमैत्रिणी, गप्पा, मधल्या सुट्टीत शाळेतून पळून येणं, तास चालू असतांनाची खूसफूस, शिक्षकांची गंमत, बेंचवरून मुलांशी भांडण, शाळेचा गणपती, स्पर्धा, झाडाखाली बसुन खाल्लेला डबा, शाळेतली खिचडी, पेपर, निकालाचा दिवस, गांधी जयंती, लोकमान्य टिळक जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गावातून निघणारी फेरी, संचलन, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षक दिन, कार्यानूभवच्या तासालाही हक्काने खेळण, एक्सट्रा तास,

कवायतीची प्रॅक्टीस....अजून काय काय ....हे शाळा,

तुला वाढदिवसाच्या तुझ्या ग्राउंडएवढ्या शुभेच्छा !!!

विलास महाजन उत्राण 



Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.