क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने महिलांचे ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्ताने महिलांचे ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात.
जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व जागतिक महिलादिनाच्या औचित्याने सत्यशोधक समाज संघ जळगाव आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे ऑनलाईन खुले कवी संमेलन शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.मायाताई धुप्पड असून प्रमुख अतिथी प्राध्यापक संध्या महाजन उपस्थित होत्या . प्रथमतः क्रांतीज्योती सावित्री मातेच्या प्रतिमेला देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार सुनील दाभाडे यांनी पुष्पांजली अर्पण केली व उपस्थितांनी भावसुमने अर्पण केली.कवी संमेलनात सुनीता पाटील तालुकाध्यक्ष खानदेश साहित्य संघ अमळनेर ( सृजनाचे वैभव ), प्रा.संध्या महाजन ( कवीतेचं बेट ),मंगल नागरे - देशमुख ( बाई ), मनीषा बिऱ्हाडे ( मी लेक सावित्रीची ),मंजुषा पाठक ( विसरू नको ),शैलजा करोडे ( कधी कधी ), जयश्री काळवीट ( उठा सावित्रीच्या लेकी ), पत्रकार कवयित्री चेतना हिरे ( युगस्त्री ), संयोगिता शुक्ल ( भारत की सुपूत्री ), रेखा मराठे ( स्त्री जन्माची व्यथा ), ज्योती राणे ( साऊ ),चित्रा पगारे ( ती अशीच आहे ), विजय लुल्हे ( आस्वादाच्या अरण्यात ) यांनी कविता सादर केल्या.शैलजा करोडे,संयोगिता शुक्ल, जयश्री काळवीट,ज्योती राणे यांच्या सुरेल कविता गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.कु.चेतना हिरे व कु.मनिषा बिऱ्हाडे या नवोदित कवयित्रींच्या आशयसंपन्न कवितांना प्रचंड दाद मिळाली !
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवयित्री जयश्री काळवीट क्रांतीज्योती सावित्री माईंच्या कार्याबद्दल मार्गदर्शन करताना म्हणाल्या," आजच्या शिक्षित महिला एकविसाव्या शतकाकडे न जाता व्रत वैकल्यांच्या आहारी जाऊन मागे जात आहेत.आता एक सावित्री पुरेशी नाही सर्वांनी सावित्री झाल्या पाहिजे आणि अन्यायाला वाचा फोडून सामर्थ्याने प्रतिकार केला पाहिजे.मेकअप मध्ये वेळ न घालवता परिवर्तनासाठी पावलोपावली अखंड लढा देत प्रबोधन केले पाहिजे."
अध्यक्षीय मार्गदर्शनात जेष्ठ कवयित्री माया धुप्पड म्हणाल्या," कविता फार मोठी शक्ती असून ती विचारांचे उन्नयन करते.आताच्या मुली लग्न होऊन अवघ्या दोन महिन्यात कायमचे सासर सोडून माहेरी येतात .उच्च शिक्षण घेऊनही त्यांना स्वैराचार आणि स्वातंत्र्य याचा अर्थ कळत नाही. मागील पिढीतली अल्प शिक्षित स्त्री अन्याय व अत्याचार सोसूनही रडगाणं न गाता जीवनाचं मोल सांगून आचार विचारांचा तोल कसा सांभाळावा हे जात्यावरच्या ओव्या गाऊन जीवनाचं तत्वज्ञान सकारात्मकतेने सांगत." मान्यवर कवितांचे समयोचित दाखले देऊन कविता जगण्याचे मनोबल देते हे सुद्धा धुप्पड मॅडम यांनी सांगून मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तथा ' तरुण भारत ' दैनिकाचे वरिष्ठ उपसंपादक रवींद्र मोराणकर साहेब ,प्रसिद्ध कवी जयवंत बोदडे उपस्थित होते. रेखा मराठे यांच्या कुटूंबातील ज्येष्ठांनी कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या सासूबाई रत्नप्रभा मराठे यांनी भारावून कवयित्री जयश्री काळवीट यांचेशी संवाद साधून कवितेचे कौतूक केले.कवी संमेलन आयोजनाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार,राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे,भगवान रोकडे ,जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील सर यांनी दिली. कवी संमेलनाचे यशस्वी आयोजन व कार्यवाही सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा डॉ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे व आम्ही सिद्ध लेखिका समुहाच्या कार्यकर्त्या ज्योती यांनी अमूल्य परिश्रम घेतले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती राणे यांनी केले.तांत्रिक सहाय्य चित्रकार सुनिल दाभाडे यांनी कुशलतापूर्वक सांभाळले.
Comments
Post a Comment